Overcome depression

किशोरवयीन मुलांमधील डिप्रेशनची (Depression) ही 8 लक्षणे प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.

ममता १६ वर्षांची सतत बडबड करणारी मुलगी. ती अभ्यासात तर हुशार होतीच पण खेळ व ईतर गोष्टींमध्ये देखील ती प्रवीण होती. घरात, शाळेत सर्वांचीच लाडकी. पण ममता हल्ली खूप शांत शांत रहायची, एकटीच शून्यात बघत बसायची. थोडी चिडचिडी देखील झाली होती. खाण्याकडे पण दुर्लक्ष करायची, त्यामुळे थोडी अशक्तही झाली होती.

दहावीच्या अभ्यासाचा ताण असेल असं म्हणून सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. हळूहळू ममता आपल्याच कोषात रहायला लागली, परीक्षेत मार्क्स ही खूप कमी मिळाले. तेंव्हा आईच्या लक्षात आलं की तिला काही तरी त्रास नक्की आहे, म्हणून मग ती ममताला समुपदेशनासाठी माझ्याकडे घेवून आली.

तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं की ती टिनएज डिप्रेशन (depression) ची शिकार झालीय. सुरुवातीला ममताला बोलतं करायला मला थोडा वेळ लागला, पण नंतर हळूहळू ती बोलती झाली. ५-६ सिटिंग नंतर ममतामध्ये मला खूप सकारात्मक बदल दिसून आले. ममताच्या आईच्या वेळीच लक्षात आलं नसतं तर कदाचित काही तरी विपरीत घडलं असतं. 

२०१५ च्या WHO च्या अहवालानुसार, भारतात डिप्रेशनच्या (depression) रुग्णांची संख्या ५० दशलक्षाहून अधिक आहे आणि संपूर्ण जगात नैराश्यामुळे आत्महत्या करणार्‍या लोकांमध्ये भारतीय अधिक आहेत.  याशिवाय, ‘डिप्रेशन अँड अदर कॉमन मेंटल डिसऑर्डर ग्लोबल हेल्थ एस्टिमेट’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, संपूर्ण जगात आत्महत्येने मरणारे बहुतेक लोक मध्यमवर्गीय देशांतील आहेत.  किशोरवयीन गटातील मुले आणि मुली या गंभीर आजाराने सर्वाधिक प्रभावित होतात.

मुंबईस्थित हेल्थ अँड वेलनेस क्लिनिकचे डॉ. भावी मोदी म्हणतात की, आजकाल देशात टिनएज डिप्रेशन (depression) ने मरणाऱ्या मुलांची संख्या खूप वाढली आहे. असंही असु शकत की, ही तरुण मुले-मुली गेल्या कित्येक महिन्यांपासून नैराश्याने ग्रस्त असतील आणि सरते शेवटी नैराश्येच्या खोल गर्तेत पडल्याने त्यांनी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

अशा नाजुक परिस्थितीत आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे, त्यांच्याशी सतत बोलत राहणे आणि नैराश्याची लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांबरोबर सल्ला मसलत करणे ही पालकांची जबाबदारी आहे. 

किशोरवयीन नैराश्येची ८ लक्षणं आज मी तुम्हाला सांगणार आहे, ही लक्षणं कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

१. सगळ्याच गोष्टीतील रस कमी होणे: 

हे नैराश्याचे पहिले आणि मुख्य लक्षण आहे. जर तुमच्या मुलाला त्याची आवडती कृती/ गोष्ट  देखील करावीशी वाटत नसेल आणि तो एकटा राहू लागला असेल तर समजून घ्या की काहीतरी चूकत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः जाऊन मुलाशी बोला.

२. चांगली झोप न लागणे:

किशोरवयीन मुले जेव्हा नैराश्याची शिकार होतात, तेव्हा त्यांच्या झोपेवरही वाईट परिणाम होऊ लागतो. जर तुमचे  मूल गेल्या काही दिवसांपासून नीट झोपू शकत नसेल आणि रात्री उशिरापर्यंत एकटे राहात असेल तर ते नैराश्याचे लक्षण असू शकते. याशिवाय जर ते मर्यादेपेक्षा जास्त झोपत असेल तर हे देखील डिप्रेशन (depression) चे लक्षण आहे. त्यामुळे मुलांच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचे दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

३. सामाजिक संवादाचा अभाव:

काही मुले लहानपणापासूनच अंतर्मुख असतात, परंतु जर तुमचे मूल आधीच खूप मनमिळाऊ असेल आणि त्याचे बरेच मित्र असतील, परंतु अचानक तो सगळ्यांना भेटणे बंद करन एकटा राहू लागला, तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी बोला आणि समुपदेशकांचा सल्ला घ्या.

४. आत्महत्येबद्दल बोलणे: 

सहसा तरुण मुले-मुली आत्महत्येबद्दल बोलत नाहीत. तुमचे मूल गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येबद्दल बोलत असेल किंवा गुगलवरून त्याच्याविषयी माहिती गोळा करत असेल, तर त्याला लवकरात लवकर मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा.

५. आहारात बदल: 

जर अचानक तुमचे मूल गरजेपेक्षा जास्त खाऊ लागले किंवा खूप कमी खाऊ लागले तर हे देखील नैराश्याचे लक्षण आहे हे समजून घ्या.  आहारात असे बदल इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतात, परंतु योग्य कारण शोधण्यासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६. शैक्षणिक स्थिती खराब होणं:

किशोरवयीन मुले जेव्हा नैराश्येला बळी पडतात तेव्हा त्याचा त्यांच्या अभ्यासावर वाईट परिणाम होतो, ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत; त्यामुळे ते परीक्षेत चांगले गुण मिळवू शकत नाहीत.  त्यामुळे एखाद्या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना ओरडण्यापेक्षा त्यामागचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

 ७.अतिसंवेदनशील: 

किशोरवयीन मुले जेंव्हा त्यांच्या पालकांशी बोलू लागतात की, ‘तुमचे माझ्यावर प्रेम नाही’ किंवा ‘तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही’, तेव्हा समजून घ्या की ते आतून आनंदी नाहीत आणि यावेळी त्यांना तुमची खूप गरज आहे. असे काही तुमच्या लक्षात आले तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका,  मुलांसोबत अधिक वेळ घालवा आणि त्यांची समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.

८. मूड स्विंग्स: 

किशोरवयीन मुलांमध्ये मूड स्विंग्स होणं सामान्य आहे, परंतु मुलांचे वर्तन दीर्घकाळ असेच राहिल्यास, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. त्यामुळे, तुमच्या मुलाच्या वागण्यात तुम्हाला एकटेपणा किंवा दुःख अधिक जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी मुलांशी बोला आणि त्याचे नेमके कारण जाणून घ्या.

         या लेखात आपण पाहिलं की, कोणत्याही गोष्टीत मन न रमणं, व्यवस्थित झोप न लागणं, इतरांमध्ये न मिसळणं, खाण्या-पिण्यात बदल होणं, शालेय गुणवत्ता खालावणं, अतिसंवेदनशील होणं, मूड स्विंग्स होणं ही सगळी किशोरवयीन नैराश्येची लक्षणं आहेत. वेळीच आपण याकडे लक्ष दिलं तर आपण आपल्या मुलांना नैराश्येच्या खोल खाईत जाण्यापासून वाचवू शकतो.

किशोरवय म्हणजे पक्षी बनून उडण्याचे वय आणि आपण असेच स्वच्छंदी उडत, भटकत असतो. हे जग खूप सुंदर आहे असे आपल्याला वाटते आणि मग कधीतरी आपल्याला या नकाराचा सामना करावा लागतो आणि आपले संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. काही मुले नकारला सकारात्मकतेने घेतात तर काही उद्ध्वस्त होतात. आजच्या लेखात मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही हसतमुखाने नकाराचा/ नैराश्याचा सामना करू शकता.

1. स्वतःला प्रश्न विचारा:

जर तुम्हाला नकार मिळाला तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मला हे का मिळवायचे होते? अभ्यासात चांगले मार्क्स, पदवी, चांगली नोकरी, नातेसंबंध, मग तुमच्या आतून उत्तर येईल स्वतःला सिद्ध करण्यासाठी, समाजाला दाखवण्यासाठी, पालकांना. तुम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर, स्वतःला विचारा, हे सर्व घडले नाही तर मी आत्महत्या करेन का? हे पूर्णपणे मूर्खपणाचे असेल. त्यामुळे ताणतणाव थांबवा आणि यशासाठी अधिक तयारी करा.

2. स्वतःला त्रास देऊ नका:

आयुष्यात सतत चढ-उतार येत असतात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला नाकारले गेले तर त्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. ती गोष्ट माझ्यासाठी नव्हती, पुढे माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं असेल, म्हणून पुढे जावं लागेल. नकारात्मक आणि वाईट विचारांनी स्वतःला त्रास देऊ नका. यामुळे तुम्ही उदास होऊन नैराश्याकडे जाऊ शकता.

3. परिस्थितीकडे नवीन दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा:

रिजेक्शन आलं की आपल्याला खूप वाईट वाटतं, पण हे बघण्याचा प्रयत्न करा की आलेल्या रिजेक्शन मधून पुढे काही तरी छान घडणार आहे. तुम्हाला ज्या साईड ला ऍडमिशन घ्यायचं होतं ते मिळालं नाही किंव्हा ज्या कॉलेज मध्ये जायचं होतं, तिथे जाता आलं नाही तर दुःखी होऊ नका, काहीतरी वेगळं आणि भन्नाट तुम्हाला मिळणार आहे.

4. नियंत्रणात रहा:

कधी कधी आपल्याला हवं ते मिळत नाही, ते मिळवण्यासाठी आपण चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. मग आपण नवीन कल्पना लढवून किंवा कारस्थान करून आपल्याला हवे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. ते मिळवण्यासाठी मला काहीही करावे लागेल असा विचार आपण करत राहतो. हे अत्यंत चुकीचे आहे. काही क्षणिक सुखासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य उधळून लावू शकतो.

५ सत्याचा स्वीकार करा:

जेंव्हा आपल्यावर सिलेक्शन किंव्हा रिजेक्शन ची वेळ येते आणि आपल्याला येस ऐवजी नो ऐकायला मिळतं तेंव्हा या घटनेला पर्सनली घेवू नका. यामुळे समस्या वाढू शकतात. मग स्वतःला विचारा की या नकाराचे कारण काय असू शकते? हा विचार स्वीकारा की नकारामुळे मला नवीन संधी मिळू शकतात, त्यामुळे माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत मी आनंदी राहू शकतो.

६. तुमचे स्वतःचेच प्रश्न तुमची उत्तरं असतील:

जेंव्हा तुम्हीं स्वतःला प्रश्न विचाराल तेंव्हा तुम्हाला तुमच्यातील चांगल्या व वाईट गोष्टी समजतील. तुम्हाला स्वतःच्या आत डोकावून आत्मपरीक्षण करावे लागेल आणि तुमच्यातील वाईट गोष्टी दूर कराव्या लागतील. तुम्ही प्रयत्न करूनच दगडाला हिऱ्यात बदलू शकता. असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे तुम्हाला स्वतःच शोधावी लागतील. या प्रश्नांची उत्तरे फक्त तुमच्याकडेच असतील.

७. स्वतःवर प्रेम करायला शिका:

जीवनात काहीही मिळवायचं असेल तर अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःला समजून घ्या कोणी काही वाईट बोलले तर लगेच स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला माफ करायला शिका. जर तुम्हीं प्रामाणिकपणे स्वतःवर प्रेम करायला लागलात, स्वतःवर विश्वास ठेवायला लागलात तर तुम्हीं तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहचू शकाल. मग अशावेळी जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही.

         तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं मला विचारू शकता. तसेच किशोरवयीन मुलांचं समुपदेशन करायचं असल्यास माझ्याशी संपर्क साधू शकता.

Fight Depression

मनमित्र डॉक्टर कल्पेश बैकर

हा लेख इतर भाषेत वाचा

Watch Video

FAQs

नैराश्य म्हणजे काय? What is Depression?

नैराश्य डिप्रेशन (depression) हा एक भावनेशी संबंधीत आजार आहे ज्यामुळे सतत दुःखाची भावना आणि स्वारस्य कमी होते. याला मेजर डिप्रेशन डिसऑर्डर किंवा क्लिनिकल डिप्रेशन देखील म्हणतात, हे तुम्हाला कसे वाटते, तुमचे विचार आणि तुमचे वागणे यावर परिणाम करते आणि विविध प्रकारच्या भावनिक आणि शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

नैराश्य आणि चिंता समान आहेत  का ?

चिंता आणि नैराश्य हे मूड डिसऑर्डरचे प्रकार आहेत. इतर गोष्टींबरोबरच, नैराश्यामुळे दुःख, निराशा आणि ऊर्जा कमी होते. चिंतेमुळे अस्वस्थता, चिंता किंवा भीतीची भावना निर्माण होते. दोन अटी भिन्न असल्या तरी, तुमच्याकडे दोन्ही एकाच वेळी असू शकतात.

नैराश्याचा तुमच्यावर कसा परिणाम होतो?

नैराश्याचा फक्त मनावर परिणाम होत नाही; त्याचा शरीरावरही परिणाम होतो. काही शारीरिक परिणामांमध्ये झोपेच्या अनियमित सवयी, भूक न लागणे (किंवा अटिपिकल डिप्रेशनसह वाढलेली भूक), सतत थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि पाठदुखी यांचा समावेश होतो.

नैराश्याची चिन्हे काय आहेत ? signs of depression

डिप्रेशन (depression) मुळे मेंदूची जळजळ आणखी वाढू शकते आणि मेंदूच्या पेशींचा मृत्यूही होऊ शकतो. याचा परिणाम म्हणजे शिकणे, तपशील लक्षात ठेवणे किंवा एखाद्याच्या मूडचे नियमन करण्यात अडचण येते. याव्यतिरिक्त, जेव्हा तुमचा किशोर/किशोरी उदास असतो तेव्हा शरीरात बदल होतात: भूकेची अनियमितता.

नैराश्यावर मात कशी करावी? How to overcome depression?

नैराश्यातून स्वतःला मदत करण्याचे 5 मार्ग
व्यायाम करा. दररोज 15 ते 30 मिनिटांचा वेगवान वॉक घ्या. …
निरोगी पदार्थ खा आणि भरपूर पाणी प्या. नैराश्य असलेल्या काही लोकांना जेवायची इच्छा होत नाही. …
स्वतःला व्यक्त करा. …
समस्यांवर लक्ष देऊ नका. …
चांगल्या गोष्टी लक्षात घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *